शरद पवार गटाची ‘या’ तारखेपासून ‘शिवस्वराज्य यात्रा 2’; जयंत पाटलांची घोषणा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी आपल्या पक्षाच्या ‘शिवस्वराज्य यात्रा-2’ ची घोषणा केली. ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्यावरून सुरू होईल. या माध्यमातून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल, असे ते म्हणाले. सद्यस्थितीत महायुती सरकार प्रचंड घाबरले आहे. त्यामुळे ते आगामी ऑक्टोबर महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये जनजागरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण राज्य सरकारच्या नीतीमुळे राज्य अधोगतीला जायला लागलं आहे आणि ज्या पद्धतीने राज्य चालू आहे. तसेच कायदा व्यवस्था नसून राज्यातील तरुणांच्या हाताचे काम शेजारचे राज्य हिसकावून घेत आहेत. हे सर्व चालू असताना राज्यकर्ते स्तब्ध बसले आहेत. युतीचे सरकार आल्यापासून राज्य मागे चालले आहे. आम्ही महायुतीचे काळे कारनामे घेऊन आलो आहोत,” असे म्हणत जयंत पाटील यांनी महायुतीचे काळ कारनामे लिहिलेला पोस्टर दाखवले आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवीन ट्वीस्ट आला आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर शिवस्वराज्य यात्रा 2 ची घोषणा केली आहे. “ही यात्रा येत्या 9 ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. खासदार अमोल कोल्हे हे प्रमुख प्रचारक असून हाच दिवस घेण्याचे प्रयोजन म्हणजे हा दिवस खास आहे. या दिवशी चले जाओ यात्रेचा नारा देण्यात आला. तसेच जागतिक आदिवासी दिन देखील आहे. त्यामुळे हा दिवस आम्ही निवडला आहे. 9 तारखेला सकाळी 9 वाजता शिवनेरीवरुन या यात्रेला सुरुवात होईल. जुन्नरमधून ही यात्रा सुरु होणार असून यामध्ये शरद पवार गटाचे सर्व नेते सामील होणार आहेत,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




