योजनांच्या जाहिरातींच्या खर्चावरुन जयंत पाटलांची सरकारवर टीका, म्हणाले…

मुंबई : राज्य शासनाने काल एक शासन आदेश जारी करून तब्बल २७० कोटी रुपयांची तरतूद शासकीय योजनांच्या ‘विशेष प्रसिद्धी मोहिमेसाठी’ केली आहे. वास्तविक ही विशेष प्रसिद्धी मोहिम नसून ‘निवडणूक प्रसिद्धी मोहीम’ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी टीका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिंदे-फडणवीस- पवार सरकारने ‘विशेष प्रसिद्धी मोहिम’ राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी तब्बल 270 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या अंदाजित खर्चाला सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली. या योजनेवरुन जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
सरकारच्या योजना या महाराष्ट्रातील जनतेसाठी नसून स्वत:चंच पुर्नवसन करण्यासाठी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आल्याने सत्ताधारी पक्ष आता प्रचंड खटाटोपात आहे आणि ऐनकेन प्रकारे जनतेच्या समोर राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी जेवढी सत्ताधारी पक्ष स्वत:ची प्रसिद्धी करतील तेवढा सामान्य जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल राग वाढत जाईल. आज राज्याची परिस्थिती काय आहे? राज्यावर कर्जाचा बोझा आहे, नवीन बांधलेल्या रस्त्यांनाही भेगा गेल्या आहेत, राज्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था खराब झाली आहे. शेतकऱ्यांची वेगवेगळ्या अडचणी आहेत. पीएचडीचे विद्यार्थी आंदोेलन करत आहेत हे सर्व सुरू असताना, राज्यावरचा कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर गेला आहे. सरकारच्या योजना या महाराष्ट्रातील जनतेसाठी नाही स्वत:चं पुर्नवसन करण्यासाठी आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




