वाघनखांवरुन राऊतांचा CM, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले, आधी स्वतःची नखं…

मुंबई : सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटावर हल्ला करत नकली म्हणून उल्लेख केला होता. यावर संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली.
राऊतांचा शिंदेंना टोला
“ज्यांनी शत्रूशी हात मिळवणी केली, ज्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार,” असा टोला राऊत यांनी शिंदेंना लगावला. “मुळात ही वाघनखं ऐतिहासिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच ती वाघनखं वापरली असतील तर आम्ही त्या वाघनखांना प्रणाम करतो. पण इतिहास आणि इतिहासतज्ञांबरोबरच लंडनचं म्युझियम सांगतयं की, खात्री नाही की ती वाघनखं तिच आहेत का,” असंही राऊतांनी नमूद केलं.
तुम्ही लोकांना फसवत आहात
“जसं भाजपा एकेकाळी मतांसाठी गंगाजलाच्या बाटल्या विकत होतं. कुठलही पाणी भरायचे आणि गंगाजल म्हणून विकायचे. त्या पद्धतीने या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात महाराष्ट्रात जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा व्यापार चालवला आहे. वाघनखं ही काय मत मागण्याची वस्तू आहे का? राजकारण करण्याची वस्तू आहे का? ती ऐतिहासिक आणि श्रद्धेची जागा आहे. तुम्ही लोकांना फसवत आहात. ही फसवणूक तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराच राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
स्वतःची नखं नीट कापा
“वाघनखांचा अपमान इतर कोणीही करत नाही. वाघनखांचा अपमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करत आहेत, हे लोक इतिहासाचा अपमान करत आहेत. हे स्वतः ड्युप्लिकेट आहेत त्यांना स्वतःला ड्युप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे,” असा टोलाही राऊतांनी थेट नाव घेत लगावला. “छत्रपतींच्या वाघनखांविषयी आम्हाला अत्यंत आदर आणि श्रद्धा आहे, पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं… वाघनखं… करत आहात त्याआधी स्वतःची नखं नीट कापा मग वाघनखांवर बोला,” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




