पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला; कोंढव्यातील घटना

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा हल्ला पुण्यातील कोंढवा भागात केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. महंमद प्यारे शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अरबाज उर्फ लॅब याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेख याने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकं काय घडलं?
अरबाज याच्या साथीदाराचे घर महंमदने पोलिसांना दाखविल्याचा संशय आरोपींना होता. आरोपी शेखवर चिडले होते. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेख कोंढव्यातील कोणार्क पुरम सोसायटीच्या परिसरातून निघाला होता. तेथील रिक्षा थांब्याजवळ आरोपी अरबाज आणि साथीदारांनी त्याला अडवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तू तबरेजचे घर पोलिसांना का दाखविले?,’ अशी विचारणा करून आरोपींनी शेखवर कोयत्याने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर अधिक तपास करत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




