जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; सरकारला 13 ऑगस्टपर्यंत दिला वेळ

जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी उपोषण स्थगित करत आहे. पण येत्या 13 ऑगस्टपर्यंत मी सरकारला वेळ देतो, तोपर्यंत त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. “मला रात्री हात पाय धरुन सलाईन लावण्यात आले. माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे असे म्हणणे होते की, आम्हाला तुम्ही आणि आरक्षण दोन्हीही पाहिजे. पण मला जर असंच सलाईन लावत असतील, तर दुपारी उपोषण स्थगित करु. कारण सलाईन लावल्याने उपोषणाला आता अर्थ नाही. त्यामुळे गावातील ज्या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला, त्यांच्या हस्ते उपोषण सोडणार” अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

Advertisement

जरांगेंकडून सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत

जरांगे पाटील म्हणाले, “मंत्री शंभूराज देसाई म्हणाले होते, आम्ही मनोज जरांगेंकडे दोन महिन्यांची मुदत मागितली होती. त्यानंतर मी त्यांना १३ जून ते १३ जुलैपर्यंतचा अवधी दिला होता. त्यांना अजून एक महिना हवा होता. यावर मी विचार केला की इथे पडून राहिलो तरी त्यांना तो वेळ मिळणारच आहे. त्यापेक्षा मी आता ठरवलं आहे आता हे आंदोलन स्थगित करेन आणि सरकारला १३ ऑगस्टपर्यंत वेळ देईन. माझं आवाहन आहे, १३ ऑगस्टपर्यंत तुम्ही करून दाखवा, तुम्ही दोन महिने मागितले होते, १३ जून ते १३ ऑगस्टपर्यंतचे दोन महिने घ्या आणि मराठ्यांना आरक्षण देऊन तुम्ही दिलेला शब्द पाळा.”

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page