अटक वॉरंटवरून मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले…

पुणे : मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. २०१३ मधील एका प्रकरणात हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांना अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अटक वॉरंटवरुन जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
जरांगे पाटील काय म्हणाले?
“मला अटक करून तुरूंगात टाकण्याच अट्टहास का, राज्यातले सर्व कोर्ट फडणवीसांच्या हातात आहेत. तो सांगेल त्यांच्या मागे एसआटी, ईडी,सीबीआय लावली जाते. त्यांच्या सांगण्याने कितीतरी जणांचे वॉरंट रद्द झाले, लोक त्यांना देव म्हणतात पण हा कसा देव आहे. हे सरळ सरळ खुन्नस काढतात. आता मी कुठेच सापडत नाही म्हणून माझ्या विरोधात वॉरंट काढायला सुरूवात केली आहे. पण मी जाणार नाही. देवेंद्र फडणवीसांचे ऐकून पोलीस आणि कोर्ट काम करणार असतील तर मी जात नसतो.
छत्रपतीचे नाटकाचे कारण काढून मला तुरुंगात टाकण्याचा आणि तिथे मारण्याचा डाव असेल तर मी हसत मरायला तयार आहे. फडणवीसांच्या हातून मीही मरण पत्करायला तयार आहे. माझ्या शंभूराजांनी हसत मरण पत्करले आहे. पण धर्मबदलला नाही, आम्हीही त्यांचेच मावळे आहोत. छत्रपतीनीं दाखवून दिले तुकडे झाले तरी चालेल पण झुकणार नाही. आता मरण आले तरी चालेल तुमच्या हाताने आले तरी चालेल, हसत मरण पत्करायला तयार आहे. पण तुमच्या पाया पडतो ती केस मागे घ्या, असे या जन्मात म्हणणार नाही. मी तुरुंगात जायला तयारी आहे. तसा मीही जायला तयार आहे. पण आता तर मी जाणारही नाही. काय करायचयं ते करा. माझ्याकडे द्याला घंटा पैसेही नाही.
नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगांचं आयोजन केलं होतं. त्यासंदर्भात नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी संबंधित नाट्यनिर्मात्यानं कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयानं नाट्य निर्मात्याची फसवणुकीचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने अटकेचे वॉरंट काढले आहे.
नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर मनोज जरांगे एकदा न्यायालयासमोर हजर राहिले होते. त्यावेळी 500 रुपयांचा दंड करुन मनोज जरांगे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आलं होतं.
2013 मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचं आयोजन केलं होतं. त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्यनिर्मात्यानं केला होता.
जन हक्क टाइम्स पुणे वार्ताहर :- अकबर शिकलकर




