छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं काय चर्चा झाली?

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जात छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य लोकांमध्येदेखील उत्सुकता आहे.
भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत, हे राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याला माहित नसल्याने संभ्रम वाढला होता. पवारांची भेट घेऊन भुजबळ हे सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीबाबत माहिती दिली.
ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांची भेट घ्यायला गेलो असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, या भेटीपूर्वी अजित पवारांशी काहीही चर्चा केली नव्हती, घरुन निघताना प्रफुल्ल पटेलांसोबत चर्चा केली होती, त्यांना सांगितलं होतं की मी शरद पवारांना भेटायला जातो आहे, माझ्याकडील सर्व कागदपत्रही त्यांना देणार आहे. या विषयावर मी चर्चा करणार आहे, ठीक आहे जा, असं पटेल म्हणाले, असं भुजबळांनी सांगितलं.
आरक्षण प्रश्नी पवारांनी लक्ष घालावं- भुजबळ
राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
शरद पवार साहेबांना आठवण करून दिली. बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देताना असाच मराठवाडा पेटला होता. तेव्हा मराठवाडा शांत करून तुम्ही निर्णय घेतला. सरकारचं काय होईल ते होईल आपण हे काम केलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही बाबासाहेबांचं नाव जोडलं. आज अशी परिस्थिती आहे. तुम्ही आलाच नाही. मुख्यमंत्री जरांगेंना भेटले काय चर्चा केली. काय आश्वासने दिली हे आम्हाला माहीत नाही, असं पवार म्हणाले. तुम्ही हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सोडवायला गेला तुम्ही त्यांना काय सांगितलं माहीत नाही, असं शरद पवार मला म्हणाले असल्याचं भुजबळांनी सांगितलं आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




