५ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी आर.पी.आय. (आ) कामगार आघाडी प्रदेशाध्यक्षांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

खेड शिवापूर : राजकीय पदाचा गैरवापर करून ५ लाख रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याच्या प्रकाराबद्दल राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील दुरकरवाडी, गराडे येथील ६१ वर्षीय ज्येष्ठ शेतकरी बाळसाहेब विश्वनाथ दुरकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे (रा. कोढणपूर, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे गराडे (ता. पुरंदर) येथे गट क्र. १३१२ मधील वडिलोपार्जित ६.५ एकर जमिनीपैकी ३ एकर जमीन सात महिन्यांपूर्वी रिंगरोडसाठी संपादित करण्यात आली. या मोबदल्यात शासनाकडून दुरकर कुटुंबाला ३ कोटी रुपये मंजूर झाले, ज्यापैकी ७८ लाख रुपये फिर्यादी बाळसाहेब दुरकर यांचा वैयक्तिक हिस्सा होता.

परिचयातून सुरू झालेली घटना…
खेडशिवापूर येथील लॉन्ड्री मालक बापू गायकवाड यांच्याशी फिर्यादी दुरकर यांची १५ वर्षांपासून ओळख होती. कपडे इस्त्रीला देताना दुरकर यांनी रिंगरोडच्या जमिनीबाबत आणि मिळणाऱ्या मोबदल्याबाबत गायकवाड यांना सांगितले. १६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास दुरकर गायकवाड यांच्या दुकानात गेले असता, गायकवाड यांनी अध्यक्ष प्रदीप कांबळे हे मंत्रालयातील ओळखींचा वापर करून अडकलेले पैसे काढून देतील, असे सांगितले. त्यानंतर कांबळे दुकानात आले आणि “माझ्या ओळखीने मंत्रालयात दबाव टाकून तुमचे पैसे काढून देतो” असे त्यांनी दुरकरांना सांगितले.

Advertisement

पैसे मिळाल्यानंतर खंडणीची मागणी…
दोन दिवसांनी शासनाकडून दुरकर यांच्या खात्यावर ७८ लाख रुपये जमा झाले. २२ डिसेंबर २०२४ रोजी पुन्हा दुरकर गायकवाड यांच्या लॉन्ड्रीत गेले असता, कांबळे यांनी मोबदला मिळाल्याबद्दल माहिती घेतली आणि “तुमचे पैसे माझ्या प्रयत्नातून मिळाले, त्यामुळे आता मला ५ लाख रुपये द्या” अशी मागणी केली. दुरकर यांनी हे पैसे शासनाकडून थेट मिळाल्याचे सांगून ती मागणी नाकारली.

घरी येऊन धमकी…
सुमारे दोन महिन्यांनंतर, कांबळे ५- ६ अनोळखी व्यक्तींना सोबत

घेऊन गराडे येथे दुरकर यांच्या घरी आले. त्यांनी पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास “तुला बघून घेतो, खोटी अ‍ॅट्रॉसिटीची केस करतो” अशी धमकी दिली. कांबळे यांच्या राजकीय पदामुळे भीतीपोटी दुरकर यांनी त्यावेळी पोलिसांत तक्रार दिली नाही.

खोटा अर्ज आणि दबाव…
जानेवारी २०२५ मध्ये दुरकर यांना राजगड पोलिसांकडून नोटीस आली की, कांबळे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कांबळे खोटा अर्ज करून दबाव आणत असून, खंडणी वसुलीचा प्रयत्न करीत आहेत, हे दुरकर यांच्या लक्षात आले. त्यानंतरही कांबळे वेळोवेळी बापू गायकवाड यांच्यामार्फत पैशाबाबत चौकशी करत राहिले.

३१ जुलै २०२५ रोजी दुरकर तक्रार नोंदविण्यासाठी राजगड पोलीस ठाण्यात आले होते; मात्र खोटी अ‍ॅट्रॉसिटी तक्रार होईल या भीतीने ते परत गेले. अखेर कुटुंबीयांशी चर्चा करून, गावचे सरपंच वसंत रावडे यांच्या सोबत त्यांनी रविवारी (१० ऑगस्ट २०२५) राजगड पोलिसांत तक्रार दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page