शहराच्या मध्यवर्ती भागात बनावट नोटा आढळल्याने खळबळ..!

- गुजरातमधील एकाला अटक
पुणे, शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या रस्ता पेठेत बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाला समर्थ पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा गुजरातमधील जामनगरचा आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपये दराच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौरव रामप्रताप सविता ( वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई लखन गंगाधर शेटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, समर्थ पोलिसांनी शुक्रवारी रात्री कोंम्बिंग ऑपरेशन राबवले होते. यावेळी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीतील लॉजेस तपासत होते. त्यावेळी एकजण हा रस्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळ थांबला असून त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पोलीस पथक तेथे गेले. पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपी तेथून निघून जाऊ लागला. मात्र त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपये दराच्या ६१ अशा ७७ हजार २०० रुपये रकमेच्या बनावट नोटा आढळल्या. त्यानुसार पोलिसांनी गौरव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
Advertisement
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039
Advertisement




