मित्राचा खून करुन पऴून गेलेल्या आरोपीला अटक, बंडगार्डन पोलिसांची कारवाई

पुणे : पुण्यातील खेड भागात वादविवादातून मित्राचा चाकू भोसकून खून केल्यानंतर फरार असणाऱ्या एका आरोपीला बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले. ससून रुग्णालयाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. सलमान अबुलगणी शेख (वय २३, वडगाव रोड, आळंदी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याघटनेत शरद गायकवाड याचा खून झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. ३ नोव्हेंबर रोजी रात्री हा प्रकार घडला होता. त्यानंतर सलमान हा पसार झालेला होता.
फरार व पाहिजे आरोपी तसेच सराईतांवर पुणे पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. यादरम्यान, बंडगार्डन पोलीस हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा ससून रुग्णालयाजवळ सकाळी साडे नऊच्या सुमारास एकजन संशयित दिसून आला. त्यामुळे त्याला पथकाने थांबवून विचारपूस केली. पण, तो घाबरला. तसेच, उत्तरे देखील उडवा-उडवीची दिली. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने चाकण ते खेड दरम्यान खरपुडी फाटा येथे मित्र शरद याचा चाकू भोसकून खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याबाबत खेड पोलिसांशी संपर्क साधत, यासंदंर्भात माहिती घेतली. तेव्हा खेड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्याला पुढील कारवाईसाठी खेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




