अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कारण आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्याआधीच सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन आरोपी बनवण्यात आलं आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला.
नवं कारस्थान रचण्यात आलं
अनिल म्हणाले, “गेल्या तीन वर्षापासून काय चालू आहे हे ते जनता पाहात आहे. तीन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणीस यांनी परमवीर सिंग आणि सचिन वाजे यांना सोबत घेऊन माझ्यावर आरोप केले होते. त्यांनी आरोप केल्यानंतर माझी चौकशीही करण्यात आली. चौकशीनंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्यावेळी हायकोर्टानं माझ्या विरोधात पुरावे नसल्याचा निकाल दिला. ऐकीव माहितीच्या आधारे माझ्यावर आरोप झाले, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. ते प्रकरण निकाली निघत असतानाच आता मी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला, असं नवं कारस्थान रचण्यात आलं,” असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
“भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला अटक करण्यासाठी मी पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आलाय. हे सर्व देवेंद्र फडणीस यांचं कारस्थान आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी माझ्यावर अशाच प्रकारे खोटे आरोप केले. आता पुन्हा त्यांनी माझ्यावर सीबीआयच्या मदतीनं गुन्हा दाखल केला. मी चौकशीला सामोरा जाईन,” अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्री गिरीश महाजन यांनी मला मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी या संदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




