देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, म्हणाले, महायुतीची सत्ता आल्यास…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू, अशी घोषणा केली आहे. ते चंद्रपूर येथील महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शनिवारी बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार फॅग्गनसिंग कुलेस्ती यांची उपस्थिती होती.
यावेळी फडणवीस यांनी, लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसवर टीका करताना, काँग्रेस सत्तेत आली तर राज्यातील योजना बंद पाडेल. लाडकी बहीण योजना बंद करेल, असा दावा केला. तर आमचे सरकार आल्यास सध्याच्या रक्कमेत वाढ करू, लाडक्या बहिणींना २१०० रूपये देऊ, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने काँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रासाठी पाच गॅरंटी दिली होती. यावेळी शरद पवार यांनी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वक्तव्य केलं होते. राज्यात ‘महाविकास आघाडी’चे सरकार आल्यास ३ लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतील, त्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल”, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले होते. यानंतर आता महायुतीने पुढचे पाऊल टाकत शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू अशी घोषणा केली आहे. यामुळे शेतकरी आता कोणाच्या आश्वासनांकडे लक्ष देवून मतदान करते? महायुती की महाविकास आघाडी कोणाचे सरकार येते ते आता २३ नोव्हेंबरलाच उघड होईल.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




