दम नव्हता तर…; मधुरिमाराजेंनी अर्ज मागे घेताच सतेज पाटील भडकले

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा मोठा उलटफेर बघायला मिळतो आहे. राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे यांना तिकीट देण्यात आले होते. एबी फॉर्म देऊन त्यांनी अर्जही भरला. मात्र उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्याने काँग्रेसची नाचक्की झाली. दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली? असा प्रश्न करून काँग्रेस नेते सतेज पाटील रागारागाने जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.
मधुरिमारजे या महाविकास आघाडीच्या उत्तर कोल्हापूरच्या अधिकृत उमेदवार होत्या. राजेश लाटकर यांना विरोध झाल्याने कॉँग्रेसने मधुरिमारजे यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यानीच अचानक अर्ज मागे घेतल्याने आमदार सतेज पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
दरम्यान, राजेश लाटकर अजूनही कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे लाटकर अज्ञातस्थळी पोहोचल्याने भूया उंचावल्या गेल्या. रविवारी छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, यावेळी बोलताना राजेश लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आली, असा थेट आरोप कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर केला होता.
लाटकर यांची समजूत काढण्यासाठी छत्रपती कुटुंबीयांकडून मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, खासदार शाहू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आदी नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांची उमेदवारी मागे घेतली जाईल, अशी चर्चा त्यानंतर रंगली होती. मात्र नाॅटरीचेबल झाल्याने एक प्रकारे काँग्रेसचं टेन्शन वाढलं होते. राजेश लाटकर हेच वेळ संपेपर्यंत अर्ज माघारी घेण्यास न आल्याने अखेर मधुरिमा राजे यांनी आपला अर्ज मागे घेतला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




