मोठी बातमी! मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान होणार आहे. अशातचं आता निवडणुकीत एका जातीच्या बळावर जिंकणे शक्य नाहीत, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा सोमवारी सकाळी केली. ते यावेळी एकाही जागेवर उमेदवार उभा करणार नाहीत. सोबत घेतलेल्या पक्ष, घटकांनी आतापर्यंतही आपल्या उमेदवारांची यादी न दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं जरांगे यांनी सांगितलंय. दरम्यान, आता निडणुकीत भाग घेतला नसला तरी मराठा समाजाने ज्याला पाडायचं आहे, त्याला पाडावं, असं जाहीर केलं आहे.
मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी आली नाही
काल मराठा बांधवांशी चर्चा झाली, मतदारसंघही ठरले. एका जातीवर कोणी निवडणूक जिंकू शकत नाही. मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी आली नाही, तर लढायचं कसं, मग मराठा बांधवांना विचारलं एका जातीवर निवडणूक लढवायची का, तर असं ठरलं की एका जातीवर निवडणूक जिंकून येता येणार नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवायची नाही, असं जरांगे पत्रकार परिषदेत म्हणाले.
मराठा बांधवांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन
त्यामुळे सर्व मराठा बांधवांना सांगतो आपले अर्ज मागे घ्या. आपला काही खानदानी धंदा नाही. आपली फसगत होईल. त्यामुळे सर्व अर्ज मागे घ्या. एकही अर्ज ठेवू नका. निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरु करु. पुन्हा आपल्या जातीसाठी आपण लढू, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले. याला पाड आणि त्याला पाड म्हणायची माझी इच्छा नाही. जिंकून कोणी तिसराच येणार. कोणीच आपल्या कामाचं नाही. मला असं करण्याची इच्छा नाही, असंही ते म्हणाले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




