जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी कारागृहातून पसार; येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पसार झाला. याप्रकरणी पसार झालेल्या कैद्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. ही घटना सोमवारी उघडकीस आली आहे.
राजू पंढरीनाथ दुसाने (वय ४३, मु पो महालगाव, ता वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. तुरुंग पोलीस शिपाई अविनाश पवार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी राजू पंढरीनाथ दुसाने याला २०१५ साली वारजे माळवाडी परिसरात झालेल्या खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. खून प्रकरणात त्याला फेब्रुवारी २०२१ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे येरवडा कारागृहातील कैद्यी मोजले जात होते. यावेळी एक कैदी कमी असल्याचे लक्षात आले. माहिती घेतली असता राजू दुसाने हा नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर संपूर्ण कारागृहात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेही आढळला नाही. त्यामुळे अखेर कैदी क्रमांक १०५६ राजू दुसाने हा शिक्षा भोगत असताना खुल्या कारागृहातून पळून गेल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जायभाय करत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




