मोटारीची काच फोडून लॅपटॉप चोरणारा तामिळनाडूतील चोरटा अटकेत; स्वारगेट पोलिसांची कारवाई

पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत. चोरट्यांमुळे नागरिक देखील हैराण झाले आहेत. अशातच आता रस्त्यावर लावलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून ऐवज, तसेच लॅपटाॅप चोरणाऱ्या तामिळनाडूतील चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. तामिळनाडूतील चोरट्यांच्या टोळीने शहर, परिसरात मोटारीचे काच फोडून ऐवज चोरीचे ११ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरट्याकडून दोन लॅपटाॅप जप्त करण्यात अले आहेत.
सुरेशकुमार पांडुरंगन सेरवई (वय ५०, रा. तामिळनाडू) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सेरवई आाणि साथीदारांनी स्वारगेट, खडक, चंदननगर, डेक्कन, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ गुन्हे केल्याचे तपासात उघकीस आले आहे.
पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारींच्या काचा फोडून रोकड, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. सर्वाधिक घटना स्वारगेट परिसरात घडल्या होत्या. स्वारगेट पोलीस ठाण्यात मोटारींची काच फोडून ऐवज चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले होते.
स्वारगेट पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता. तांत्रिक तपासात चोरट्यांनी चोरलेला लॅपटाॅपचा वापर बंगळुरूतील एक जण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक बंगळुरूत पोहाेचले. सेरवईला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने पुण्यात मोटारींची काच फोडून लॅपटाॅप, रोकड असा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




