संतापजनक! बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार, आरोपीला अटक

बदलापूर : बदलापूर शहरातील पूर्वेत असलेल्या एका नामांकीत शाळेत अवघ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळा आणि पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास मोठा वेळ घेतल्याने पालकांत संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या प्रकरणानतंर पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर तक्रार नोंदवण्यात आली.
मुख्य आरोपीला अटक
यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीला अटक केली. अक्षय शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. तो 24 वर्षांचा असून, या शाळेतील सफाई कर्मचारी म्हणून तो काम करत होता.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




