चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेविरुद्ध अकबर शिकलकर आक्रमक; आत्मदहन करण्याचा दिला इशारा

चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेविरुद्ध अकबर शिकलकर चांगलेच आक्रमक झाले आहेत, पतसंस्थेतील गैरकारभारासह इतर अनेक मुद्द्यावरुन उद्या 10 तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले शिकलकर?
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थे बाबत आज पर्यंत २० ते २५ पेक्षा जास्त तक्रारी सहाय्यक निबंधक चिपळूण, जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोंकण विभाग नवी मुंबई व सहकार आयुक्त कार्यालय सहकारी संस्था पुणे या कार्यालयातून दाखल आहेत. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था यांच्या अंतर्गत आर्थिक असणाऱ्या नियम बाह्य कर्ज प्रकरणे, सोने तारण प्रकरणे या विषया वरुन संस्थेचे सभासद तसेच काही सामाजिक संघटना यांनी आमरण उपोषण व धरणे आंदोलने केली आहेत, मात्र आज पर्यंत सहकार विभागाने चौकशी चालू असल्याचे नाटक करून पतसंस्थेच्या कामकाजातील अनियमितता व आर्थिक गैर व्यवहार या बाबत संस्थेला पाठीशी घातले आहे. ज्या सभासदानी पतसंस्थेबाबत लेखी तक्रारी केल्या अशा सभासदांना संस्था चालक व त्यांचे हस्तक यांचेकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या असून तशी तक्रार पाटण पोलिस स्थानकात दाखल ही आहे. या संबधी मी या पूर्वी आपणांस पत्र व्यवहार करून दिनांक २३/०९/२०२४ रोजी चिपळूण सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्र आपणांस दिले होते.
चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विरोधात केलेल्या तक्रारींची दखल गेल्या तीन वर्षामध्ये सहकार आयुक्त दखल घेत नसून, या पतसंस्थेचे मुख्य कार्यालय रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे असल्याने मी सहाय्यक निबंधक चिपळूण यांच्या कार्यालया समोर दिनांक २३/०९/२०२४ रोजी धरणे आंदोलन केले, मात्र तेथील सहाय्यक निबंधक श्री. सुशांत घोलप यांनी पोलिसां समक्ष अवसायक नेमण्याचे अधिकार मला नसून ते अधिकार आयुक्त व निबंधक पुणे यांना असल्याचे सांगितले. यापूर्वीही तक्रारदारांना जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे रत्नागिरी कार्यालय प्रमुख यांनीही असेच उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकली आहे. मात्र आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिल्या नंतर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या असणाऱ्या गैर व्यवहारावर पतसंस्थेच्या बाजूने अहवाल देताना वाचवण्याचे काम जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक करताना दिसून येतात.
पतसंस्थेमध्ये कर्ज व्यवहार हे नियम बाह्य होत असून करोडोची कर्ज पतसंस्थेचे संचालक व नातेवाईक यांनी घेतल्याचे उघड होत आहे. तसेच पतसंस्थेत मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांच्या ठेवींची गुंतवणूक केल्याचे समजते, त्यामुळेच पतसंस्था किंवा सहकार कार्यालयातील अधिकारी कर्जदार व ठेवीदार यांची यादी माहिती अधिकारातही देत नाहीत किंवा ह्या बाबतची माहिती वार्षिक अहवालात प्रसिद्ध केली जात नाही. या बाबत वार्षिक अहवालावर आक्षेप घेऊनही आयुक्त कार्यालय या बाबत निरूत्तर आहे.
चिपळूण नागरी पतसंस्थेचे व्यवहार एखाद्या बँकेपेक्षा ही मोठ्या प्रमाणात आहेत, तितकाच मोठा आर्थिक भ्रष्टाचारही आहे. त्यामुळे वेळीच ठेवीदारांना सावध करणे आवश्यक आहे, अन्यथा इतर मोठमोठ्या सहकारी बँका व पतपेढ्या बुडाल्याने आयुष्याची कमाई गमावल्याने जशी रस्त्यावर येण्याची वेळ नागरीकांवर आली तशी या पतसंस्थेमुळे येऊ नये या करीताच अवसायक न नेमल्यास मी सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालया समोर दिनांक ०९/१०/२०२४ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. आता सहकार आयुक्त कार्यालय यांना गेले दोन महीने पुरेसा कालावधी चिपळूण नागरी पतसंस्थेची चौकशी करण्यासाठी दिला होता. त्यामुळे त्यांनी मी आत्मदहन करण्याच्या दिवशी ०९/१०/२०२४ ला “आम्ही चौकशी समिति नेमतो, चौकशी करतो….” अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन माझे आत्मदहन थांबवण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ ठरणार आहे, त्यामुळे मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. यामध्ये माझे कुटुंबाची मरणोत्तर जबाबदारी सहकार आयुक्त विभाग व प्रशासनाची राहील हे मी जाहीर करीत आहे. असं अकबर शिकलकर म्हणाले.
नेमकं काय आहेत मागण्या?
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था चिपळून यांच्या आर्थिक व्यव्हाराची सहकार खात्यामार्फत टेस्ट ऑडिट करुन पतसंस्थेतील अनियमतेबाबत चौकशी करावी.
खोटे ठेवीदार व कर्जदार यांची यादी प्रसिद्ध करावी.
संभाव्य खओट्या नोटा चलनात आणणाऱ्या शाखाप्रमुख अमित कासारकडून पतसंस्थेतील जमा रकमेच्या सर्व नोंदीची चौकशी व्हावी.
पतसंस्थेतील संचालक, त्यांचे नातेवाईक, व 50 शाखेतील संचालक यांच्या सगळ्या कर्जाची तपासणी व्हावी.
ठेवीदार यांच्या केवायसी व ठेवीची रक्कम व कालावधी उघड करावा. जेणेकरुन काळा पैसा गुंतवणूक व संस्थेचे खोटे व्यव्हार उघड होतील.
वरील मागण्यांची दखल घेऊन पतसंस्थेवर प्रशासक- अवसायक नेमणूक तोपर्यंत 23 सप्टेंबर पासून सहाय्यक निबंधक कार्यालय परकार कॉम्लॅक्स चिपळून येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा अकबर शिकलकर यांनी दिला आहे.




