महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले; बंगळुरूमधील धक्कादायक घटना

दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी घटना बंगळुरूमध्ये घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तब्बल ३० तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. खून झालेल्या महिलेचे नाव महालक्ष्मी असं होतं. बंगळुरूच्या व्यालिकवल परिसरात शनिवारी (दि.२१ सप्टेंबर) ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या तरुणीचे नाव महालक्ष्मी (२९ वर्ष) आहे. तिच्या पतीचे नाव हेमंत दास आहे. पण गेल्या काही दिवसांपासून महालक्ष्मी एकटीच राहत होती. सदर खून १५ दिवसांपूर्वीच झाला असून महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे करून १६५ लीटरच्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आले आहेत. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी याची माहिती महालक्ष्मीच्या नातेवाईकांना दिली. त्यांनी येऊन पाहिल्यानंतर सदर प्रकार उघड झाला आहे. व्यालिकवल पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.
अतिरिक्त पोलीस आयुक्त एन. सतीश कुमार यांनी सांगितले की, आम्ही न्यायवैद्यक पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले असून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या नाराधमी कृत्यामागचे नेमके काय कारण होते? हे अद्याप कळू शकलेले नाही. आमचा पुढील तपास सुरू आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




