सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; पती, सासूसह 4 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या करून जीवन संपवले आहे. गौरी मनोज गायकवाड (वय ३६, रा. अहिल्या सोसायटी, आंबेडकर चौक, येरवडा) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उज्वला रमेश अडागळे (वय ५३, रा. कळेळा कोंढवा) यांनी येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे.
दरम्यान या आत्महत्येप्रकरणी महिलेचा पती मनोज सुरेश गायकवाड (वय ३७), सासू मंदा (वय ५६), दीर आकाश (वय २६), नणंद रेखा कांबळे (वय ४५) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. गौरी यांचा आरोपी मनोज याच्याशी २००९ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांचा सासरी छळ सुरू होता. किरकोळ कारणावरून त्यांना टोमणे मारत होते. माहेरहून दागिने आणि पैसे आणण्यास सांगण्यात आले. पैसे न दिल्यास माहेरी निघून जा, असे त्यांना सांगितले.
शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली, तसेच अन्नातून दोन वेळा विषारी औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्रासामुळे गौरी यांनी शुक्रवारी (२० सप्टेंबर) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे त्यांची आई उज्वला यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




