पुण्यात बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार, 3 आरोपींना अटक

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. आधी कोलकाता, नंतर मुंबई, पुणे, अकोला अनेक ठिकाणी अत्याचारांच्या धक्कादायक घटना समोर आल्या, अशातच बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसर परिसरातील एका खोलीत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे यश उर्फ सोन्या आटोळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
14 सप्टेंबरला दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस स्थानकात देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोन ही मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववी इयत्ते शिकत होत्या. मात्र त्यांची शाळा जरी वेगळी असली तरी त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या 14 सप्टेंबरला राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या.
पुढे बसने त्या पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुलींपाठोपाठ तो ही बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. तिथे रात्री त्यांना दारु पाजण्यात आली. त्यानंतर त्या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने त्यांचे आळीपाळीने लैंगिक शोषण केले.
या घटनेनंतर यामुली हादरून गेल्या होत्या. यातील एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची तातडीने माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले. गायब झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे 16 तारखेला या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणले. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्याला दारू पाजण्यात आली. शिवाय लैंगिक शोषणही करण्यात आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर तातडीने पावलं उचलत ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे मिळाली. पुढे बेंगारे व सोन्या आटोळे या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील चौथा आरोपी अजून फरार आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




