गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ६ हजार कर्मचारी असणार तैनात

पुणे : पुण्याच्या वैभवी गणेशोत्सवाची सांगता उद्या मंगळवारी होणार आहे. या साठी मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरून उद्या मिरवणुका निघणार असल्याने पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक उपयुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. उद्या शहरातील विसर्जन मार्गासह मध्यभागातील प्रमुख रस्ते व इतर १७ रस्ते वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच पोलिस बंदोबस्तही मोठया प्रमाणात वाढवला आहे.
पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन सोहळ्यासाठी ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरुन मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली या बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. सकाळी ७ पासून बंदोबस्त सुरू होणार असून, तो मिरवणुकीची सांगता होईपर्यंत तैनात असणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत. शहर व उपनगरात बंदोबस्त असणार असून, मुख्य मिरवणूकीसाठी अतिरीक्त बंदोबस्त ठेवला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नागरिकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




