पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे तरुणीची आत्महत्या, हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पतीचे बाहेरील महिलेशी असलेल्या विवाहबाह्य संबंध तसेच कौटुंबिक त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हडपसर भागातील भेकराईनगर येथे हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल केला. तेजश्री आकाश उदमले (वय २२ रा. शिक्षक कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आकाश अशोक उदमले (वय २५) याच्यावर हडपसर पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. याबाबत तेजश्रीची आजी देऊबाई पांडुरंग नेटके (वय ६५, रा. कोरेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश आणि तेजश्री यांचा मार्च २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर देखील आकाश याचे बाहेरील तरुणीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती तेजश्री यांना मिळाली. नंतर तिने याबाबत आकाश याच्याकडे विचारणा केली. तेव्हा आकाशने तिला मारहाण केली. ‘तुला मुलं होणार नाही, तू वांझोटी आहे’, असे म्हणून त्याने छळ सुरु केला. तो घरखर्चाला पैसे देत नव्हता. त्याचा त्रास असह्य झाल्याने तेजश्रीने ७ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास उपनिरीक्षक विनोद पवार करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




