महिलांचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा जेरबंद, १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील दागिणे हिसकावणार्या चोरट्याला अलंकार पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्याची उकल करत पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकीसह १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अक्षय गणपती तोडकर (वय २३, रा.दत्तवाडी, मुळ. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजीत काळे, सोमेश्वर यादव यांच्या पथकाने केली.
२६ ऑगस्ट रोजी डीपीरोड कर्वेनगर परिसरातून मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले होते. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुह्याचा तपास करत असताना पथकाने सीसीटीव्ही पडताळले. त्यातील तांत्रिक विश्लेषनाद्वारे तोडकर याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने तोडकरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तोडकर याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून आणखी एक असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. अक्षयचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तो नोकरीच्या शोधात होता. त्यानिमित्ताने काही महिन्यांपुर्वी पुण्यात आला होता. मात्र, त्याने महिलांचे दागिणे हिसकावण्यास सुरूवात केल्याचे पोलिसांनी सांगितले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




