पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणालाअटक; गावठी पिस्तुल, 2 जिवंत काडतुसे जप्त

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, यासाठी पोलिसही सतर्क झाले आहेत, अशातच आता पिस्तूल विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असलेल्या तरुणाला चतु:श्रृंगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या तरुणाकडून पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. कुणाल संतोष लांडगे (वय २१, रा. आंबेडकर वसाहत, डी पी रोड, औंध) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक प्रणील चौगुले व पथकातील विशाल शिर्के, पोहवा श्रीधर शिर्के, पोहवा दांगडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पथक शनिवारी गस्त व पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कुणाल लांडगे याच्याकडे गावठी पिस्तुल आहे. तो पिस्तूलाची विक्री करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पथकाने त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडून गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याने हे पिस्तूल कोणाकडून आणले होते, याबाबत तपास केला जात आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील हे करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




