नितेश राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवलं; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

मुंबई : भडकाऊ भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी मुस्लिमांना उघड धमकी दिली होती. मुस्लिमांना निवडून- निवडून मारणार असल्याची धमकी नितेश राणे यांनी दिली होती. या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर चिथावणीखोर भाषणे आणि हत्येच्या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ठिकाणी नितेश राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा श्रीरामपूर आणि दुसरा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. नितेश राणेंनी मुस्लिमांना खुलेआम धमक्या दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
‘मी चालायला लागलो तर लोकं दारं बंद करतात, मी हिंदूंचा गब्बर आहे’, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने अहमदनगरमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, रामगिरी महाराज यांना विरोध केला तर मशिदीत घुसून एकेकाला मारू अशी धमकीही दिली. त्यांच्या या वक्तव्यांचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत.
या मोर्चात नितेश राणे म्हणाले की, माझा इतिहास सर्वांना माहिती आहे. दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यांपैकी हे राणे कुटुंबीय आहे. बाकी कोणातच हिंमत नव्हती. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काऊंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे. हिंमतीने सर्व करा, कुणी काय इथे करू शकत नाही. आपल्या जिभेला काही हाड नाही. पाहिजे तेव्हा मी बोलतो त्यांच्यासमोर मी जाऊन बोलतो. मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय… मी हिंदूंचा गब्बर आहे हे लक्षात ठेवा, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.




