शिंदेंच्या आमदाराच्या बॉडिगार्डने भर रस्त्यात केली एकाला मारहाण, Video व्हायरल

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकांने एका व्यक्तीला रॉडने मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडीओ ठाकरेंच्या शिवेसेनेने ट्वीटरवर पोस्ट केलाय. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महेंद्र थोरवे आमदार आहेत, त्यांच्या बॉडीगार्डने ही मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भर रस्त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शेअर केलेल्या व्हिडिओत आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षारक्षक एका कार चालकाला मारहाण करताना दिसत आहे. रॉड सारखी एक वस्तू त्याच्या हातात दिसतेय. त्या वस्तूने तो कार चालकाला बेदम मारहाण करतोय. कार चालकाकडून माफी मागण्याचा प्रयत्न होत असतानाही सुरक्षा रक्षक त्याला मारहाण करतोय. व्हिडिओच्या शेवटी सुरक्षा रक्षक फलंदाजी करण्याच्या स्टाईलमध्ये कार चालकाला मारहाण करताना दिसतोय. रस्त्यावर अनेक वाहनांची आणि लोकांची रहदारी दिसतेय. पण कार चालकाला मारहाण करण्यापासून कोणीही वाचवताना दिसत नाहीए. नेरळमधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचं नाव शिवा असल्याची माहिती समोर आली आहे.
महेंद्र थोरवेंचं स्पष्टीकरण
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या व्हिडिओशी आपला काहीही संबंध नाही, हा कार्यकर्त्यांचा आपापसातील मतभेद आहे. मारहाण करणारा व्यक्ती आपला सुरक्षारक्षक नसल्याचंही थोरवे यांनी म्हटलं आहे. पण मारहाण करणारा आणि मार खाणारा दोघंही आपल्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याची कबुली थोरवे यांनी दिली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




