नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक; तब्बल ‘इतके’ लाख रुपये उकळले

पुणे : पुण्यात फसवणूकीचे सत्र सुरूच आहे, सायबर चोरट्यांकडून आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे, अशातच आता कमांड हॉस्पिटलमध्ये विविध पदांवर नोकरी लावण्याच्या आमिषाने माजी कर्मचाऱ्यानेच अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने तब्बल ४९ लाख रुपये उकळल्याचे समोर आले असून, याप्रकरणी आरोपीविरुध्द सहकानरगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे आरोपी आणि तक्रारदार चांगले मित्र आहेत. आरोपीने तक्रारदारांच्या माध्यमातून अनेक तरुणांकडून पैसे गोळा करत ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी राजेंद्र काशीनाथ हगवणे (वय ५३,रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार विनायक तुकाराम कडाळे (वय ४३,रा. मार्केटयार्ड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हगवणे हे निवृत्त शिक्षक आहेत. तर कडाळेने कमांड हॉस्पिटलमधून व्हिआरएस घेतली आहे. कडाळे याने तक्रारदाराला २०२१ मध्ये फोन करुन कळवले की वानवडीतील कमांड हॉस्पिटलमध्ये क्लर्क, संगणक ऑपरेटर, माळी, शिपाई आदी जागा भरावयाच्या आहेत. कोण इच्छुक उमेदवार असतील तर नोकरीसाठी ७० हजार भरावे लागतील. तक्रारदाराने मुलीसाठी प्रयत्न करायचे ठरवले. तेव्हा कडाळेने आणखी कोणी नातेवाई, मित्र असतील तर त्यांनाही निरोप देण्यास सांगितले. त्यानुसार हगवणे यांनी मित्र -मंडळींना निरोप देत नोव्हेंबर २०२१ मध्ये स्वत:च्या घरी कडाळेसह एक बैठक घेतली. त्यानूसार अनेक पालकांनी आपल्या मुलांसाठी ५० ते ७० हजाराची रक्कम दिली. ती त्यांनी पत्नीच्या खात्यावरुन कडाळे याच्या खात्यात वर्ग केली.
डिसेंबर २०२२ मध्ये बराच पाठपुरावा केल्यानंतर परिक्षेचे कार्ड बनवून दिले. यावर परिक्षेची तारीख १२ फेब्रुवारी २०२३ अशी होती. तक्रारदार मुलांना घेऊन कमांड हॉस्पिटलला परिक्षेसाठी गेले असता, तेथे त्यांना समजले की अशी कोणतीही परिक्षा नाही तसेच कमांड हॉस्पिटलने भरतीसाठी जागाही काढल्या नाहीत. त्यांनी कडाळे संदर्भात विचारणा केली असता, त्याने २०१९ मध्येच व्हिआरएस घेतल्याचे समजले.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




