खासगी क्लासच्या शिक्षकाकडून 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, नाशिकमधील संतापजनक प्रकार

नाशिक : बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज ठिकठिकाणी आंदोलन होत असतानाच नाशिकमध्ये 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. खासगी क्लासमधील शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असून पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या उपेंद्रनगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुलींच्या पालकानी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडको परिसरात खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच १० वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग झाला. संबंधित पिडीत मुलगी खासगी क्लासमध्ये एकटीच अभ्यास करत बसली होती. त्यावेळी क्लासमध्ये शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. या प्रकारानंतर पीडित मुलगी क्लासवरून घरी आली. पण दुसऱ्या दिवशी क्लासला जाण्यास तिने नकार दिला. त्यावेळी पिडीत मुलीच्या आईने तिला विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला. त्यावेळी तिने आईला तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
मुलीसोबत जो प्रकार घडला ते ऐकल्यानंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षकाविरूद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात 32 वर्षीय शिक्षकाविरूद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी आता क्लासमधील सर्व पालकांकडून केली जात आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




