बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा लाठीचार्ज, 12 तासांनी आंदोलकांना हटवलं

बदलापूर: चिमुकल्या मुलींच्या अत्याचारानंतर संतप्त बदलापूरकरांनी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करत रेल्वे मार्ग रोखून धरला होता. सातत्याने विनवण्या करून, मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आवाहनानंतरही आंदोलक जुमानत नसल्याने अखेर पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला करत दहा मिनिटात रेल्वे रूळ मोकळा केला. पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर आंदोलन रुळावरून हटले. यावेळी काहींनी पोलिसांवर दगडफेकही केली.
बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरु असताना संतप्त पालकांनीही शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलंय.. या घटनेच्या निषेधार्थ बदलापुरातील रिक्षाचालकांनी बंद पुकारलाय. दरम्यान याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक आणि मुलांना ने आण करणा-या सेविकांना निलंबित करण्यात आलंय.. तसंच कंत्राटी पद्धतीनं सुरु असलेला सफाई कामगारांचा ठेकाही रद्द करण्यात आलाय.. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणा-या पोलिस निरिक्षकाचीही बदली करण्यात आली आहे.
गिरीश महाजनांची चर्चा निष्फळ
आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. सरकारकडून गिरीश महाजन, आमदार किसन कॅथोर, आमदार बालाजी किणीकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक मागणीवर ठाम असल्यानं आंदोलकांसोबतची गिरीश महाजनांची चर्चा निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे महाजन आंदोलनस्थळावरून माघारी गेले.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




