हिंजवडीत भर दिवसा दरोडा, पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्समधील ऐवज लंपास

पुणे : चार चोरटयांनी भर दिवसा पिस्तुलाच्या धाकाने सराफी दुकानात दरोडा टाकल्याने खळबळ उडाली. आयटी हब म्हणून ओळख असणाऱ्या हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौक येथे शिवमुद्रा ज्वेलर्स येथे शुक्रवारी (दि.२) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सुधाकर पोपट पाटील (२५, रा.दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांचे हिंजवडी येथे लक्ष्मीचौक परिसरात शिवमुद्रा ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे, शुक्रवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दरम्यान सव्वा दहाच्या सुमारास तीन चोरटे त्यांच्या दुकानात घुसले तर एक साथीदार बाहेर थांबला. त्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तर इतर साथीदार दुकान लुटू लागले. चोरटयांनी बेंटेक्सचे बोरमाळ, पेंडल, नेकसेल, मंगळसूत्र, टॉप्स असा १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज बॅगेत भरला. त्यानंतर दुचाकीवर पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरु आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




