सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले, पीएमार्फत…

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असे सचिन वाझे यांनी म्हटले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचेही वाझेंनी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
“जे काही झालं, त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या पीए मार्फत पैसे जायचे. सीबीआयकडे याचे पुरावे आहेत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिलीय. मी सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे. मी जयंत पाटील यांचं सुद्धा नाव दिलय” असं सचिन वाझेने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात बंद आहे. त्याला रात्री वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणलं होतं. त्यावेळी एएनआयशी बोलताना त्याने हे खळबळजनक दावे केले.
सचिन वाझे या प्रकरणात आरोपी
सचिन वाझे मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी आहे. 100 कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणात तो आरोपी आहे. त्याशिवाय 2021 मध्ये अँटिलायबाहेर बॉम्ब ठेवणं आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी आहे. आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी केला. अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत पुरावे दिले, तर पुढच्या 3 तासात त्यांचा पदार्फाश करु असं आव्हान चित्र वाघ यांनी अनिल देशमुखांना दिलं होतं.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




