प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलले; साताऱ्यातील घटनेने खळबळ

सातारा : कराड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला उंच इमारतीवरून खाली फेकले. त्यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. आरुषी सिंग असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळ बिहारमधील मुजफ्फरपूर येथील रहिवासी होती. ध्रुव चिक्कार असे आरोपीचे नाव असून तो हरियाणातील सोनीपतचा रहिवासी आहे. दोघे कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होते.
नेमकं काय घडलं?
साताऱ्यातील कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये आरुषी आणि ध्रुव पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. प्रेयसी आरुषी आणि ध्रुव यांचे दिल्लीत एकत्र शिकत असताना पासूनचे प्रेम संबंध होते. त्यामुळे त्यांनी एकत्रच कराड मधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या जवळच असलेल्या सन सिटी इमारतीमध्ये तो राहत होता. बुधवारी ध्रुवणे आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतलं होतं. तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध आहेत असे म्हणत त्याने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. यात आरुषीचा जागीच मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत ध्रुवही जखमी झाला असून, त्याचा पाय मोडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप त्यास अटक झालेली नाही.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




