देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

मुंबई : राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. तसेच सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणीही सुरु असून महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे.

Advertisement

बावनकुळे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ट संघटक आहेत. शासन आणि प्रशासनामध्ये काम करण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे संघटनेला मोठा फायदा होईल. मात्र, याबाबत केंद्रीय नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील. पण माझ्या दृष्टीने केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतल्यास आम्हाला मान्य राहील. मात्र, महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेसाठी त्यांचं येथील सरकारमधील स्थान महत्वाचं आहे. तसंच संघटनेमधीलही स्थानही महत्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला हेच वाटेल की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहावं. कारण ते आमचे नेते आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आले आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page