पुण्यात तुफान पाऊस; खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग

पुणे : पुण्यात रात्रभर तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मुसळधार पावसामुळं खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आला आहे. संध्याकाळी धरणातून मुठा नदीमध्ये 9 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. आता तो विसर्ग वाढवला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी 6 वाजता 35574 क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच धरण परिसरात 100 मिमी व घाटमाथ्यावर 200 मिमी पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या पावसामुळे पुणे शहरातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Advertisement

पुण्यात ३२ वर्षातील सर्वाधिक पाऊस

पुण्यात गेल्या ३२ वर्षांमध्ये इतका पाऊस झाला नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिलीय. ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासात तब्बल ५५६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर, पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले असून लोणावळा, शिरगाव, कोयना परिसरात तुफान पाऊस झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

“सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यासोबतच पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page