अतिक्रमणावरील कारवाईचे सत्र सुरूच, कोंढवा खुर्द, कौसरबाग परिसरातील बेकायदा बांधकाम हटवले

पुणे : महापालिकेचे अतिक्रमणावरील कारवाईचे सत्र सुरूच असून, सोमवारी (दि. २२) कोंढवा खुर्द मुख्य रस्ता, कौसरबाग परिसर, वडगाव, धायरी परिसरात सुमारे ३७ हजार चौरस फूट बेकायदा बांधकामासह अतिक्रमण हटविण्यात आले.

पुणे महापालिकेच्या हद्दीत शहरासह उपनगर भागात अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभाग, अतिक्रमण आणि आकाशचिन्ह विभागाने संयुक्त कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे. कोंढवा खुर्द मुख्य रस्ता, कौसरबाग परिसर, वडगाव व धायरी परिसरात फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनची सुमारे ३७ हजार चौरस फूट इतके बेकायदा बांधकामासह अतिक्रमण जमीनदोस्त केले.

Advertisement

महापालिकेच्या झोन २ आणि झोन ५ ने सोमवारी ही संयुक्त कारवाई केली. कोंढवा खुर्द मुख्य रस्ता, कौसरबाग परिसर येथे फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनची सुमारे २२ हजार चौरस फूट इतक्या क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली. तसेच यावेळी ८० नोटिसा देण्यात आल्या. तसेच वडगाव आणि धायरी परिसर येथे फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनची सुमारे १५ हजार चौरस फूट कारवाई करण्यात आली. यावेळी तीन नोटिसा देत पत्रा शेडचे कच्चे बांधकाम पाडण्यात आले.

कारवाई सुरूच राहणार

पुणे महापालिकेच्या हद्दीतील पदपथ, फ्रंट मार्जिन, साईड मार्जिनमधील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, अनधिकृत बोर्ड, बॅनर, होर्डिंग निर्मूलन कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, राजीव नंदकर यांच्या आदेशाने कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापुढेही अशी संयुक्त कारवाई मोहीम चालू राहणार आहे. ज्या नागरिकांनी किंवा व्यावसायिकांनी अनधिकृत अतिक्रमण केले असतील त्यांनी स्वतःहून काढून घेऊन पुणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन अतिक्रमण विभागाने केले आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page