मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न; ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

पंढरपूर : आज आषाढी वारीचा सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. ते मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.
शिंदे कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र केली पूजा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी, वडिल संभाजीराव शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी झाले.
एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाला साकडे
पांडुरंगाच्या आशीर्वादाने सलग तीन वर्षे विठ्ठलाची महापूजा करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पाऊस चांगला झाला आहे. पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचे संकट नाही. यंदा मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार चांगले काम करत आहे. चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे. या राज्यातील प्रत्येक घटक सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे, असे साकडं एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातले.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




