अल्पवयीन मुलींच्या दारुपार्टीनंतर एकीने नशेत घेतला गळफास, नेमकं काय घडला प्रकार?

पुणे : पुण्यातून वारंवार धक्कादायक घटना समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा दोन अल्पवयीन मुलींसोबत भयंकर घडलं. पुण्यातील येरवडा भागातील दोन अल्पवयीन (16 वर्षे) मैत्रिणींनी घरात दारूपार्टी केली. दारूच्या नशेत त्या दोघींपैकी एकीने गळफास घेत स्वत:चा जीव संपवल्याचा प्रकार घडला. जास्त दारू प्यायल्याने दुसरी मैत्रिण बेशुद्धावस्थेत आढळली आहे.
तनिषा शांताराम मनोरे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तर, दुसरी १६ वर्षीय मुलगी दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, तनिषा लक्ष्मीनगरमधील वडार वस्ती भागात राहण्यास आहे. ती अकरावीच्या वर्गात शिकते. तर तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. आई आणि ती घरी राहतात. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ती आणि तिच्या एका मैत्रिणीने तनिषाच्या घरी दारू पार्टी केली. दरम्यान, तनिषाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाला तनिषाची मैत्रिण फोन करून रात्री आठच्या सुमारास बोलली होती. तेव्हा तो मुलगा तनिषाच्या घरी आला. त्याने घरात पाहिले असता त्याला तनिषाने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्याने तनिषाला खाली उतरवून तोंडावर पाणी मारले. त्यानंतर लागलीच तनिषाच्या आईला घटनेची माहिती दिली. त्यानंतर आई घरी आली. त्यांनी तनिषाला रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यापुर्वीच तिचा मृत्यू झालेला होता.
त्याचवेळी तनिषाची मैत्रीण देखील बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यांनी तिला उठविले. तेव्हा ती दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आले. तिच्या आई-वडिलांनी लागलीच तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता या दोघींनी दारू पार्टी केल्याचे समोर आले आहे. दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या देखील केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पार्टीत त्यांना दारूची नशा जास्त झाली होती. त्यात मैत्रिण बेशुद्ध पडली. त्यामुळे तनिषाने कधी गळफास घेतला हे समजू शकलेले नाही. तर तिने गळफास लावून आत्महत्या का केली, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




