जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी कारागृहातून पळाला, येरवडा खुल्या कारागृहातील घटना

पुणे : येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली. पसार झालेल्या कैद्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. आत्माराम उर्फ आत्म्या लाडक्या भवर असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २६२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भवर मूळचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या देवीपाडा गावचा आहे. २००९ मध्ये त्याने देवीपाडा गावात एकाचा खून केला होता. याप्रकरणी त्याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.गुन्ह्यात त्याला न्यायालायने जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दंड न भरल्यास सहा महिने कारवास भोगावे लागेल, अशी तरतूद न्यायालयाने आदेशात केली होती. भवर येरवडा कारागृहात होता. भवरची वर्तणुक चांगली असल्याने त्याची रवानगी कारागृह प्रशासनाने खुल्या कारागृहात केली होती.

Advertisement

खुल्या कारागृहातील कैदी शेती करतात. शनिवारी दिवसभर भवर खुल्या कारागृहात होता. कारागृहात रक्षक तौसिफ सय्यद यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास कैद्यांची हजेरी घेतली. तेव्हा भवर उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यावेळी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. तेव्हा तो कारागृहातून पसार झाल्याचे लक्षात आले. यानंतर याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी हेमंत पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पसार झालेल्या भवरचा शोध घेतला जात आहे. पोलीस नाईक जाधव तपास करत आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page