नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त, ओैंध परिसरात कारवाई

पुणे – विधानसभा निवडणुकीत स्थिर पथकांच्या नाकाबंदीत मुंबईहून पुण्यातील सराफ व्यावसायिकांना पाठविलेले ४ कोटी १६ लाख रुपयांची ४ किलो चांदी तसेच १ कोटी ५७ लाख रुपयांचे दोन किलो सोने असा ऐवज जप्त केला. पोलिसांनी याबाबतची माहिती प्राप्तीकर विभाग वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागातील अधिकाऱ्यांना दिली असून त्यांच्याकडून याबाबत तपासणी केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या वेगवेगळ्या भागात नाकाबंदी लावण्यात आली आहे. ओैंध येथील राजीव गांधी पुलावरुन शनिवारी सकाळी १ वाहन पुण्याकडे निघाले होते. नाकाबंदीतील पोलिसांनी वाहन तपासणीस अडवले. तपासणी केली असता त्यात ४ किलो ४७९ ग्रॅम चांदी आणि २ किलो ५११ ग्रॅम सोने सापडले. जप्त केलेल्या सोन्या चांदीचे किंमत पावणेसहा कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चैाकशीसाठी एकाला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले सोने आणि चांदी शहरातील सराफ व्यावसायिकांना देण्यात येणार होते. याप्रकरणी प्राप्तीकर विभाग, तसेच वस्तू आणि सेवा कर विभागातील अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. एका कुरिअर कंपनीमार्फत पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर येथील सराफ व्यावसायिकांना सोने, चांदी पोहचिवण्यात येणार असल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची नोंद चतु:शृंगी पोलिसांत केली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




