राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची भररस्त्यात हत्या, मुंबईतील खळबळजनक घटना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षावर हल्ला करण्यात आला आहे. यात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर काल(शुक्रवारी) धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
भायखळा मधील म्हाडा कॉलनीच्या मागील परिसरात सचिन कुर्मी यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सचिन कुर्मी जखमी अवस्थेत होते. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सचिन कुर्मी यांना जे जे रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केलं. मध्यरात्री एकच्या सुमारास सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
हल्ल्याचं कारण काय?
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय की वैयक्तिक कारणावरून झाला याविषयीची माहिती अद्याप समजू शकली नाही. सचिन कुर्मी यांच्या समर्थकांकडून तसंच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तर पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




