‘… तर मी राजकारणातून संन्यास घेईन’; जरांगे पाटलांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस संतापले

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचं आहे, मग सगेसोयरे असेल किंवा आरक्षण असेल पण देवेंद्र फडणवीस हे ते होऊ देत नाहीत असा मनोज जरांगे यांचा आरोप आहे, या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण राज्याचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारानुसारच सर्व मंत्री काम करत असतात. शिंदे साहेब आणि मी आम्ही एकत्रितपणे काम करतो. आमचा एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी कोणताही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आणि मी तो थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त घेईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

Advertisement

मराठा समाजासाठी आजपर्यंत जे निर्णय झाले ते एक तर मी घेतले किंवा शिंदे साहेबांनी घेतले. मी कायम एकनाथ शिंदेंच्या पाठिशी ठामपणे उभा राहिलो आहे. त्यामुळे जाणीवपूर्व नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी पुन्हा एकदा सांगतो जर शिंदे साहेबांनी सांगितलं की त्यांना मराठा आरक्षणाकरता एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि मी त्या निर्णयात अडथळा निर्माण केला, तर मी लगेच राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यास घेईन, असा ठामपणे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आता, फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, एकनाथ शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं. मराठा आरक्षणाच्या निर्णयात देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं होतं. त्यावेळीही मी मंत्री होतो, त्या समितीमध्ये होतो, त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतात असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामध्ये, कुठलंही तथ्य नाही, हा खोटा आरोप आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांच्याकडून होत असलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रोखठोक भूमिका मांडली.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page