जरांगे पाटलांची आज पुण्यात शांतता रॅली, मोठी गर्दी होण्याची शक्यता; वाहतुकीतही बदल

पुणे : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरु आहे. आज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पुणे शहरातून जाणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागातून शांतता रॅली जाणार असून यामुळे वाहतूकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सारसबागपासून जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात होणार असून गरवारे पुलावर त्यांच्या रॅलीचा समारोप होणार आहे. यामुळे शहरातील प्रमुख रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच रॅली पुढे गेल्यानंतर मागील रस्ते वाहतूकीसाठी खुले करण्यात येणार आहे.
मनोज जरांगे यांच्या गाड्यांचा ताफा कात्रजमार्गे सारसबाग येथे दाखल होणार आहे. सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर सकाळी अकरा वाजता शांतता फेरीला सुरुवात होणार आहे. बाजीराव रस्ता, शनिवारवाडामार्गे ‘एसएसपीएमएस’ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून फेरी जंगली महाराज रस्त्याने पुढे जाणार आहे. डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर खंडुजीबाबा चौकात फेरीची सांगता होणार आहे. तेथे मनोज जरांगे मार्गदर्शन करणार आहेत.
स्वारगेट परिसरातील जेधे चौक, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




