पूजा खेडकरच्या वडिलांच्या अडचणी वाढणार, तहसीलदाराने दिली तक्रार

पुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यत चर्चेत आलेल्या पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेतच. मात्र आता तिचे वडिल दिलीप खेडकरांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आयएएस उमेदवारी रद्द केलेली आणि तत्कालीन प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिला जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे, यासाठी दबाव आणल्याने पूजा हिचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दिलीप खेडकर यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. पोलिसांनी अर्जाची चौकशी सुरू केली आहे.
पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार दिलीप आकडे यांनी तक्रार अर्ज दिला आहे. पुणे पोलिसांकडून या अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आयएएस प्रशिक्षणार्थी म्हणून पूजा खेडकर यांची पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती. दरम्यान यानंतर मात्र त्या स्वतंत्र कॅबिन, शिपाई तसेच खासगी गाडीवर अंबर दिवा यामुळे वादग्रस्त ठरल्या. त्यांनी व त्यांच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पूजा यांना सुविधा द्यावी यासाठी एकप्रकारे दबाव आणला. याबाबत शासनाला एक अहवाल सादर केला होता. तत्पुर्वी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन, शिपाई किंवा इतर गोष्टी नसतात. मात्र त्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. यामुळे त्या वादात अडकल्या. त्यात आता त्यांचे आयएएस पद देखील रद्द झाले.
दरम्यान आता याप्रकरणी तहसीलदार दिलीप आकडे यांनी कामात अडथळा आणला असल्याबाबत तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला आहे. त्या अर्जाची चौकशी सुरू केली असून, संबंधित तहसीलदार यांना जबाबासाठी बोलवण्यात आले होते. मात्र ते आज येऊ शकले नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




