आमदार शिवतरेंना वगळले, महायुतीत वादाची ठिणगी..?
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सदस्य पदावरून वगळण्यात आले आहे.

पुणे : राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सदस्य पदावरून वगळण्यात आले आहे. जिल्ह्यात शिवतारे हे शिवसेना (शिंदे) पक्षाचे एकमेव आमदार असतानाही त्यांना संधी न दिल्याने महायुतीत नाराजी पसरली आहे. आमदार शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वादामुळे शिवतारे यांना डावलले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांना संधी देण्यात आली आहे. महायुतीत भाजपचे मित्रपक्ष म्हणून सहभागी असलेले शिवसेना (शिंदे) पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. रायगडचे पालकमंत्रिपद महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आले होते. त्यावरून शिवसेना (शिंदे) पक्षाचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचे पालकमंत्री पद रिक्त ठेवले आहे.
जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्ह्यातल्या कोणत्या आमदारांना मतदारसंघातील विकासासाठी किती निधी मिळणार हे ठरविले जाते. या समितीमध्ये सदस्य म्हणून काम करणाऱ्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळतो. पुरंदरचे आमदार शिवतारे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे) पक्षाचे एकमेव आमदार आहेत.राज्यात महायुतीची सत्ता असल्याने प्रत्येक पक्षाच्या किमान एका आमदाराला जिल्हा नियोजन समितीत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळेल, असे अपेक्षित होते. पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही मंत्रिपद आलेले नाही. त्यामुळे किमान जिल्हा नियोजन समितीवर तरी शिवसेनेला संधी दिली जाईल, अशी चर्चा असताना शिवतारे यांना डावलल्याने महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे
लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीच्या काळात विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढण्याची तयारी केली होती. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत शिवतारे यांची समजूत काढून उमेदवारी मागे घेण्यास लावली. मात्र या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. विधानसभेच्या निवडणुकीत पुरंदरची जागा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेली असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवतारे यांच्या विरोधात या मतदारसंघात उमेदवार उभा केला होता. या निवडणुकीत शिवतारे यांचा विजय झाला. तर अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव झाला. अजित पवार पालकमंत्री झाल्याने महायुतीत असतानाही आमदार शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरून वगळण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




