दौंडमध्ये तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून, हत्येचा थरार CCTV मध्ये कैद

दौंड : दौंड तालुक्यातील खामगाव येथे एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात कारणावरुन दाजीने मेव्हण्याचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडलीय. खामगाव गावातील घडामोडी चौकात ही घटना घडली. सुरज राहुल भुजबळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अमित बहिरट असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
मयत सुरज यांची बहिण संजना हिचा प्रेम विवाह अमित बहिरट याच्याशी दिड वर्षापुर्वी झाला होता. ते दोघे मुंबई येथे रहात होते. दारु व्यसनातुन संजनाचा अमित हा छळ करत होता. त्याच्या त्रासाला वैतागून संजना माहेरी आली होती. तरी देखील त्या ठिकाणी येऊन अमित बहिरट हा पत्नी संजना हिचा छळ करत होता. त्यामुळे संजनाच्या फिर्यादीनुसार अमित बहिरट याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी नातेवाईकांनी घेतलेल्या समझोता बैठकीतच अमितने संजनास सोडचिठ्ठी देण्यासाठी ५ लाख रुपये मागणी केली. त्यावेळी अमित याने सोडचिट्टी तर देणार नाही, तसेच तुझ्या मुलाचे तुकडे करीन अशी धमकी मयत सुरज भुजबळ च्या आईला धमकी दिली.
शनिवारी सुरज हा त्यांच्या कापड दुकानात बसला असता अमित जयवंत बहिरट आणि समीर जयवंत बहिरट या दोघा भावांनी सुरज राहुल भुजबळ याचा खून केला. एकुलता एक मुलाचा खून झाल्याने आईने फोडलेला हंबर्डा हृदय हेलावणारा होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण सांगे यांनी भेट दिली. याप्रकरणी अमित बहिरट व समीर बहिरट या दोघांनाही अटक करण्यात आले आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




