जरांगे निवडणूक लढवणार नाहीत हे मी लिहून देतो; लक्ष्मण हाकेंचा दावा

अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी 5 व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं. आता ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेतून आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील हे निवडणूक लढू शकत नाहीत हे माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
जरांगे निवडणूक लढवणार नाहीत
सध्या हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा सुरु असून यामधून त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले, जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेकी बाळांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरावी, जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आई बहिणीवर शिव्या घालाव्यात, ही काही निवडणूक लढवण्याची साधन आहेत का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. तसेच मनोज जरांगे निवडणूक लढवणार नाहीत, हे मी पेपरवर लिहून देतो. त्यांची लढाई ही आरक्षणाची नसून फक्त वर्चस्वाची आहे, अशी घणाघाती टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
पुढे त्यांनी ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा जरांगे पाटील यांचा डाव असल्याचा आरोप केला. हाके म्हणाले, ना धनगर आरक्षणाबाबत कुठलीही आपुलकी नाही. शरद पवार आणि जरांगे यांची समांतर लाईन आहे, शरद पवार बारामतीमध्ये जे वक्तव्य करतात, त्याचीच लाईन जरांगे पकडतात. जरांगे पाटील फक्त तारीख पे तारीख देऊ शकतो. याशिवाय जरांगे दुसरे काही करू शकत नाहीत. निवडणुकीमध्ये कोणाविरुद्ध प्रचार करतात हेही सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचा प्रचार करेल, निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही विचार नाही आणि मॉडेल नाही. आणि ते निवडणूक लढवणार देखील नाही, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




