जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या अजय बारस्करांची गाडी जाळली; पंढरपुरातील घटना

पंढरपूर : मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जाळली आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारे त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांची कार आषाढी एकादशीच्या पहाटे जळाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
महाराज पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर त्यांनी आपली एमएच १२ बीपी २००१ ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या ६५ एकर येथील भक्तिसागर येथे पार्क करून ते स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. यानंतर काल एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली. यानंतर तातडीने अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, या घटनेत १ लाखाचे नुकसान झाल्याचंही बारस्कर यांनी तक्रारीत सांगितलं आहे.
याबाबत अजय महाराज बारस्कर यांना विचारले असता त्यांनी कार जाळण्यामागे जरांगे पाटील यांचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. “मी मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही आरोप केले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मला सतत धमक्या येत असतात. माझी कार जरांगे पाटलांच्या समर्थकांनी जाळली असल्याची मला खात्री आहे. याबाबत मी पोलिसांना हे सांगितले आहे,” असं बारस्कर म्हणाले.
जरांगे समर्थकांनी केलेला धमकीचा एक फोन देखील व्हायरल झाला आहे. यात थेट बारस्कर याना शिवीगाळ आणि धमकी हा समर्थक देत असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकारामुळे आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या बारस्कर यांची गाडी जळाल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून पोलीस आता या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही व इतर माहितीच्या आधारे चौकशी करीत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




