लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; किती मिळणार पैसे?

पंढरपूर : राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरातून प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादषीनिमित्त पहाटे पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली. यानंतर त्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली.
या योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार ?
जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे.
मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं
आषाढी वारीचा आज सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झालीय. पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. बळीराजा सुखी होऊ दे, पाऊस चांगला पडू दे, सुगीचे दिवस येऊ दे असं साकडं यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठूरायाला घातलं.
जन हक्क टाइम्स पुणे वार्ताहर :- अकबर शिकलकर




