ड्रग्ज मुक्त प्रभाग व ड्रग्ज मुक्त पुणे..!

दिनांक २९/४/२०२६ रोजी सायंकाळी ०७.०० वा ते ०८.०० वा चे मुदतीत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ मध्ये व पुणे महानगरपालिका प्रभाग क्र २० व २१ चे समवेत ड्रग्ज मुक्त प्रभाग ड्रग्ज मुक्त, पुणे या अभियानाअंतर्गत कार्यक्रम आण्णाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी, पुणे येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री गणेश शिंदे, श्री. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, श्री पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चीम प्रादेशिक विभाग, श्री. मिलिंद मोहिते, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर तसेच पुणे महानगरपालिकेच्या वतीने श्री श्रीनाथ भिमाले, चेअरमन स्थायी समिती, श्री राजेंद्र उर्फ आबा शिळीमकर, श्रीमती मानसीताई देशपांडे, श्रीमती मनिषाताई चोरबेले, श्री प्रसन्नजीत वैरागे, श्रीमती तन्वी दिवेकर, श्री गौरव घुले व श्रीमती सिध्दीताई शिळीमकर व सुमारे ७०० ते ७५० नागरिक उपस्थित होते.

सुरुवातीस मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी व्हिडीओ व पोस्टरव्दारे नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी तयार केलेल्या मोटार वाहनाचे उद्घाटन केले व ड्रग्ज मुक्त प्रभाग व ड्रग्ज मुक्त पुणे या सेल्फी पॉईट येथे फोटो काढले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ श्री मिलींद मोहिते, यांनी केले या कार्यक्रमादरम्यान श्री मोहिते यांनी अंमली पदार्थ व त्याचे मानवी शरिर व कुटूंबावर होणारे दुष्परिणाम हा दाखविण्यात आला. श्री मनोज पाटील यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन वाहतुक, निर्मिती प्रतिबंध करण्यासाठी व त्याची माहिती पोलीसांना देणेकरीता, पुणे पोलीस आयुक्तालयाचेवतीने ड्रग्ज फ्रि पुणे हे मोबाईल अॅप विकसीत केले असून त्याचे लोकार्पण केले. याबद्दलची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.

Advertisement

प्रास्तावीकपर भाषण करताना श्री श्रीनाथ भिमाले यांनी सध्या विविध माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करुन अंमली पदार्थांचा व्यापार केली जात आहे यामध्ये तरुण पिढी याच्या अंमलाखाली जाताना दिसत आहे अंमली पदार्थ हद्दपार करणे ही फक्त पोलीसांची जबाबदारी नाही तर लोक प्रतिनिधी म्हणून आमचीही जबाबदारी आहे व पुण्याचा सुजाण नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. अंमली पदार्थाचे समुळ उच्चटन करणेसाठी पोलीसांच्या मदतीने नागरिकांनी सहकार्य करावे अन्यथा भविष्यात उत्कृष्ठ सोयी-सुविधा असतील परंतू याचा लाभ घेण्यासाठी निरोगी व्यक्ती नसतील अशी भिती व्यक्त केली.

श्री गणेश शिंदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनावेळी कुटूंबप्रमुख म्हणून प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते कि, आपली मुले काय करतात, त्यांचेशी संवाद साधला पाहिजे, अंमली पदार्थ सारख्या गोष्टींना नाही म्हंटले पाहिजे, सशक्त समाज घडवितानाची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली पाहिजे. समाजव्यवस्था बिघडविणा-या उपद्रवी घटकांवर बारकाईने नजर ठेवून त्यांचे विघातक विचार नष्ट केले पाहिजे असे सांगीतले.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यामध्ये पुणे पोलीस आयुक्तांच्यावतीने पुणे शहरात ड्रग्ज मुक्त प्रभाग, ड्रग्ज मुक्त पुणे अभियान सुरु केले असून यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या व उपलब्ध पोलीस मनुष्यबळ यामध्ये मोठी तफावत आहे. याकरीता नागरिकांच्या सहभागाने सदरचे अभियान १०० टक्के यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पोलीसांना ड्रग्ज फ्रि पुणे या मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती द्यावी, संबधीत इसमांवर कठोर कारवाई केली जाईल, पुणे पोलीस दल नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असते व भविष्यातही राहिल असे सांगीतले.

या कार्यक्रमादरम्यान पुणे शहर पोलीस दलातील नागरिकांचा जीव वाचवून तसेच फायरिंग केलेले आरोपी पकडून उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या ४ पोलीस अंमलदार १) पोहवा राऊत, वाहतुक शाखा, २) पोशि अनिल शेलार, ३) पोशि मांगडे वारजे पोलीस ठाणे, ४) पोशि तलवारे चंदननगर पोलीस ठाणे यांना श्री मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी प्रत्येकी रोख २५ हजार व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. कार्यक्रमासाठी उपस्थित वक्ते व मान्यवरांचे आभार श्रीमती सिध्दी शिळीमकर यांनी मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page